नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात पाळीव जनावरांची मान्सूनपूर्व तपासणी करुन त्यांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात पावसाळ्यात लाळीखुरगत व इतर आजारांनी जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात घडले आहेत. जनावरांना योग्य ते उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्याची मागणी पशुपालकांकडून करण्यात आली आहे.
वीज समस्या
अक्कलकुवा : शहरातील चार ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. शहरातील अनेक भागात आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज दुरुस्तीसाठी पुरेसे कर्मचारी आणि १०० एमव्हीचा ट्रान्सफार्मर अक्कलकुवा येथील वीज कंपनीच्या कार्यालयाला मिळत नसल्याने शहरातील वीज समस्या सुटू शकलेली नाही.
पाणीटंचाई वाढली
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाई वाढली आहे. तालुक्यातील ३०पेक्षा अधिक गावे आणि १००च्या जवळपास पाड्यांवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या टंचाई निवारण आराखड्याची याठिकाणी अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आरोग्य केंद्र वेठीला
नंदुरबार : तालुक्यातील लहान शहादे येथे रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर महामार्गाचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. यातून रस्ता उंच झाल्याने आरोग्य केंद्राकडे जाताना उतार लागत आहे. त्यामुळे रुग्ण व गर्भवती मातांना अडचणी येत आहेत. याकडे संबधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पथदिवे नादुरुस्त
धडगाव : तालुक्याच्या विविध भागातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पथदिवे नादुरुस्त असल्याने रात्री या भागात अंधार असतो. आरोग्य केंद्रांमध्ये लाखो रुपयांचा खर्च करुन साैर पथदिवे आणि हायमास्ट लावण्यात आले होते. परंतु, हे दिवे सध्या बंद पडल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाला उत्पादकांचे नुकसान
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात भाजीपाला पिकवून त्याची विक्री बाजार समितीत करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कायम आहे. शेतातून शहरात उत्पादन आणण्याचा खर्च वाढला आहे. लाॅकडाऊनमुळे वाहनभाडे वधारले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे बाजारात माल आल्यानंतर त्याला योग्य तो भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मेथी व कोंथिंबीर भर उन्हाळ्यात जुडीच्या दरात विक्री होत आहे.
पथक वाढवा
नंदुरबार : आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात फिरत्या स्वॅब संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, पथकांची संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील अनेकजण अद्यापही वंचित असल्याने पथकांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. नवापूर तालुक्यात या पथकांची फिरस्ती वाढविण्याची मागणी आहे.
गावे पडली ओस
नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून अनेकजण लाॅकडाऊनचे पालन करत आहेत. दुसरीकडे शेतीकामेही आटोपली असल्याने मजूरवर्ग घरीच बसून आहे. यंदा परराज्यात जाणेही शक्य नसल्याने मजूरवर्ग घरीच आहे.