तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांच्या बदल्या होऊन तीन आठवडे झाले. मात्र, त्यांना अजून बदली शाळेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले जात नसल्याने या शिक्षकांनी सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांना साकडे घालून तातडीने कार्यमुक्त करण्याची मागणी केली. दरम्यान त्या शाळांवर शिक्षक मिळाल्या बरोबर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तळोदा,धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ४२ शासकीय आश्रमशाळा चलविल्या जात आहेत. या कर्मचाऱ्यांचा बदल्यांची कार्यवाही नाशिक आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून केली जात असते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी बदल्या रखडल्या होत्या. परंतु शासनाच्या आदेशानंतर यंदा बदल्या करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने तळोदा प्रकल्पातील २७ शिक्षकांच्या बदल्या इतर शाळांमध्ये केल्या आहेत. या बदल्या २ ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. असे असताना त्यांना तळोदा प्रकल्प प्रशासनाकडून बदली झालेल्या शाळेवर पाठवण्यात आलेले नाही. बदली होऊन तब्बल तीन आठवडे उलटले असताना कार्यमुक्ती बाबत अजूनही कार्यवाही होत नसल्यामुळे या शिक्षकांनी सोमवारी प्रकल्प अधिकारी डॉ. मैनेक घोष यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. एका शाळेवर ड्युटी करूनच तब्बल १२ ते १३ वर्षे झाली आहेत. आता आदिवासी विकास विभागाने आम्हाला न्याय दिला आहे. त्यामुळे आम्हाला नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर प्रकल्प अधिकारी डॉ. घोष यांनी तुमच्या जागेवर अजूनही शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तेथे शिक्षक आल्याबरोबर तुम्हाला कार्यमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षकांना दिले.
आयुक्त कार्यालयाच्या उदासीन भूमिकेबाबत नाराजी वास्तविक आदिवासी विकास विभागाने तळोदा आदिवासी विकास प्रकल्पात आयुक्त कार्यालयाकडून १८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना संबंधित शाळेवर लगेच रूजू करणे अपेक्षित असताना अजूनही ते शिक्षक तेथे देण्यात आलेले नाही. आयुक्त कार्यालयाच्या अशा उदासीन धोरणाबाबत शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपायुक्त कार्यालयाकडून इकडे दुर्गम भागात बदली झालेले शिक्षक शुद्धीपत्रक काढून लगेच बदली रद्द करतात अथवा सोयीची शाळा बसवून घेतात. त्यामुळे येथील शिक्षकांवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
अशा शिक्षकांच्या पगार बंद करण्यात यावा
नाशिक आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये तिकडील शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात बदली झालेले हे शिक्षक येथे रूजू होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील बदली झालेल्या शिक्षकांना त्याची झळ सोसावी लागत असते. आदिवासी विकास विभागाच्या अशा धोरणामुळे तळोदा प्रकल्पातील अनेक शाळांमध्ये पदे रिक्त झालेली आहेत. साहजिकच नाशिक आदिवासी विकास विभाग याला जबाबदार असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. जे शिक्षक बदली झालेल्या शाळांवर रूजू होणार नाही अशा शिक्षकांचा पगार बंद करण्यात यावा, अशी मागणी देखील प्रकल्प अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
एटीसी कार्यालयाकडून तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांवर बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर दुसरे शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे पुरेशा शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तेथे शिक्षक आल्याबरोबर यांना कार्यमुक्त करण्यात येईल.
- डॉ मैनेक घोष, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा