शहादा तालुक्याच्या पूर्वेला मंदाणे, शहाणे व जयनगरच्या वनक्षेत्रात येणाऱ्या लंगडी, घोटाळी शहाणे, मालगाव, भुलाने, बोरपाणी या भागात वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे. गुरुवारी झाडांची कत्तल झाल्याचा प्रकार समोर आला असला तरी प्रत्यक्षात रविवारपासून ही तोड सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे. मोठा जमाव सर्रास वृक्षतोड करत असल्याने लंगडी येथील जागरुक आदिवासी बांधवांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तसेच नागपूर येथील मुख्य कार्यालयात कळविल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली.
वृक्षतोडीसाठी मोठा जमाव असल्याने स्थानिक वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी हतबल झाले होते. जमावाकडे कुऱ्हाडी, धाऱ्या, तिरकामठे अशी धारदार शस्त्र असल्याने त्यांना अडविण्यास वन कर्मचाऱ्यारी धजावले नाहीत.
वन कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी, जंगल मात्र वाऱ्यावर
मंदाणे, जयनगर व शहाणे येथे स्वतंत्र वनपाल व चार-पाच वनरक्षक असे २० कर्मचारी नेमणुकीला आहेत. त्यापैकी एक, दोन कर्मचारी वगळता वनपालासह अन्य कर्मचारी मुख्यालयात न राहता शहादा या तालुक्याच्या ठिकाणी राहतात. शहाणे येथे वन कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आहेत. मात्र, तेथील वनपालही मुख्यालयात वास्तव्याला नाहीत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
लंगडी व शहाणे जंगलात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवैधरीत्या झाडांची कत्तल सुरू असल्याचा प्रकार समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली व लंगडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. याप्रसंगी वृक्षतोड झालेल्या ठिकाणी नव्याने वृक्षलागवड केली जाईल व झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल व वनविभागातील कर्मचाऱ्यांचा सतत पहारा व गस्त घालण्यात येईल, असे आश्वासन उपवनसंरक्षक के. बी. भवर यांनी यावेळी दिले. प्रसंगी वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल रत्नपारखी, खुणे, जयनगर वनपाल डी. बी. जगदाळे, एस. एस. इंदवे, भरतसिंह राजपूत, डी. के. जाधव, पी. एस. पाटील, मंडलिक व वनकर्मचारी उपस्थित होते.