मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशसेवेत असणा:या आपल्या जवानांप्रती प्रत्येकाला आदर आणि अभिमान असतो. परंतु सैताणे, ता.नंदुरबार या गावाला आपल्या भुमिपूत्र सैनिकाचा अभिमान काही औरच आहे. 15 ते 20 वर्ष देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावून सेवानिवृत्तीनंतर गावी परतलेल्या जवानाचे स्वागत सैताणे करांनी आपल्याच थाटात केले. भव्य मिरवणूक, सामुहिक सत्कारात बालगोपाळांसह अबालवृद्ध सहभागी झाले. या अनोख्या स्वागताच्या कार्यक्रमाचा अभिमान आणि चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे. पूर्वी सैन्य दलात भरती होणे म्हणजे जसे युद्धात सहभागी होणे असे समजले जात होते. घरची मंडळी सहसा राजी होत नव्हती. परंतु सध्याची तरुणाई सैन्यदलात भरतीसाठी मोठय़ा प्रमाणावर उत्सूक आहे. नंदुरबार तालुक्याचा विचार करता आसाणे आणि सैताणे या गावातील अनेक तरुण मोठय़ा संख्येने सैन्यदलात सेवेत आहेत. त्याचा अभिमान या दोन्ही गावांना आहे. या दोन्ही गावातील सैनिक सेवानिवृत्त होऊन गावी परतल्यावर त्यांचा भव्यदिव्य सत्कार आणि स्वागत करण्याची परंपरा आता या दोन्ही गावांनी सुरू केली आहे. सैताणे येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या सैनिकाचा स्वागताचा भव्यदिव्य कार्यक्रम आणि मिरवूणक प्रत्येक सैनिकाचा आणि देशप्रेमी नागरिकाचा ऊर भरून येईल अशीच होती.गावातील सुपूत्र रावसाहेब जगन्नाथ पाटील हे नुकतेच आर्मि एअर डिफेन्समधून सेवानिवृत्त झाले. त्यांची जास्तीत जास्त सेवा ही जम्मू-कश्मिरमध्येच झाली. त्यामुळे कायम सतत एकीकडे शत्रू आणि दुसरीकडे आतंकवादी या दोन्ही आघाडींवर त्यांना लढावे लागत होते. परिणामी त्यांच्यासह पंचक्रोशीतील सैन्यदलात असणा:या जवानांविषयी नेहमीच चिंता वाटत होती. आता रावसाहेब सेवानिवृत्त होऊन गावी परतले. ते परतणार असल्याची माहिती मिळताच गावातील तरुण मंडळींनी एकत्र येत आपल्या भुमिपूत्राचा सन्मान त्याच अभिमानाने आणि देशप्रमाणे करायचे ठरविले. पाटील हे थेट जम्मूहून गावी आल्यावर गावाच्या वेशीवरच त्यांचे भव्य स्वागत झाले. डीजे, बॅण्डच्या निनादात आणि देशप्रेमाच्या घोषणांनी आसमंत दुमदूमन गेला. निघालेली मिरवणूक प्रत्येकाच्या हृद्याचा ठाव घेणारी आणि देशसेवेविषयी ऊर भरून निघणारी ठरली. सामुहिक सत्कार आणि त्यातून झालेले मनोगतं प्रत्येकाच्या मनात आणि हृद्यात देशाविषयी किती अभिमान भरला आहे हे दर्शविणारी होती. एका अनोख्या उपक्रमाचे साक्षीदार ठरल्याचा अभिमान गावक:यांना आहे.
अनोखी मिरवणूक..जवान रावसाहेब पाटील, त्यांची प}ी, आई-वडिल यांना एका सजविलेल्या उघडय़ा जीपमध्ये बसविण्यात आले. गावाच्या वेशीपासून त्यांची डिजे आणि बॅण्डच्या तालावर मिरवणूक निघाली. गावातील मुख्य भागातून मिरवणूक विठ्ठल मंदीर चौकात आली. तेथे संपुर्ण गावाने जवान पाटील यांचा सन्मान केला. पाटील यांनीही आपले अनुभव कथन करून यातून तरुणांना चांगली प्रेरणा मिळावी आणि प्रत्येक सैनिकाचा असा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रत्येक भूमिपूत्राचाकरणार सन्मान.. सेवानिवृत्तीनंतर गावी परतणा:या प्रत्येक भुमिपूत्र सैनिकाचा असेच आणि यापेक्षा अधीक जोमाने स्वागत करण्याचा निर्धार सैताणे करांनी केला आहे. यामुळे तरुणांमध्ये सैन्यदलाप्रती आकर्षण आणि कर्तव्यभावना जागृत होऊन जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवा करावी हा उद्देश असल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.डी.जी.पाटील यांनी सांगितले. सैताणे गाव नेहमीच विविध उपक्रमात आघाडीवर असते. प्रत्येक ग्रामस्थाला गावाचा अभिमान आहे. या गावाने आता देशसेवा, प्रशासकीय, पोलीस, शिक्षण आणि इतर सेवेत असणा:यांना अशाच पद्धतीने गौरविण्याचे ठरविले आहे. इतरांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे माजी सरपंच बापू पाटील यांनी सांगितले.