लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :खदानीत काम करतांना माती व दगडाचा मलबा पडून दोन परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी दुपारी दीड वाजता वरुळ, ता.नंदुरबार शिवारात घडली. याप्रकरणी खदान ठेकेदार दोन परप्रांतीयांविरुद्ध उपनगर पोलिसात कामात निष्काळजीपणा आणि सुरक्षीततेची उपाययोजना न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी इंद्रदेव तांती (२८), संजय छकू तांती (२९) रा.कटोरिया, जि.बांका (बिहार) असे मयतांची नावे आहेत. तर व्यंकटाशास्त्री सुब्रमन्याशी पुल्ले, प्रोजेक्ट मॅनेजर, रा.काकीनाडा (आंध्रप्रदेश), सुरेंद्रसिंग बृजभूषणसिंग, खदाण सुपरवायझर, रा.अमिलीय, जि.रेवा (मध्यप्रदेश) दोन्ही हल्ली रा.तळोदारोड, नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत. तपास पोलीस निरिक्षक बाळासाहेब भापकर करीत आहे. यातील दोन्ही संशयीतांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या खदानी असून त्या ठिकाणीही सुरक्षा उपायांबाबत गांभिर्याने पहावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.’ वरुळ शिवारात दगडांची खदान आहे. ती स्वस्तीक इन्फ्रा लॉजिंग प्रायव्हेट कंपनीकडून चालविली जाते. या ठिकाणी दगड, मुरूम काढली जाते. येथे अनेक परप्रांतीय कामगार कामाला आहेत. २७ रोजी नेहमीप्रमाणे या ठिकाणी काम सुरू असतांना पावसाच्या पाण्यामुळे वरील भागातील मलबामध्ये दलदल झाली. त्यामुळे खदाणीत काम सुरू असतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक मलवा ढासळला. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांपैकी भवानी व संजय तांती हे दाबले गेले. त्यात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत २९ जुलै रोजी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरिक्षक धनराज निळे यांनी फिर्याद दिली. कामात निष्काळीपणा आणि सुरक्षीततेची कुठलेही साधने न वापरल्याने दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व्यंकटाशास्त्री सुब्रमन्याशी पुल्ले व सुरेंद्रसिंग बृजभूषणसिंग या दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.