लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यासह परिसरात गेल्या १५ ते २० दिवापासून सतत पाऊस सुरू असून, पोळ्यानंतर पावसाने आपला जोर चांगलाच वाढविल्याने खरीप पिकाचे नुकसान होत असून, ‘जारे जारे पावसा’ अशा भावना शेतकरींकडून व्यक्त होत आहेत.तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात होत असलेल्या संततधार पावसाने मुग, उडीद, कापूस या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरींकडून होत आहे.दरम्यान, परिसरात मुग, उडीदच्या शेंगा परिपक्व झाल्याचे चित्र असून, सततच्या पावसाने पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी शेंगांना कीड लागली असून, त्या पावसाच्या पाण्याने सडत असल्याचे चित्र आहे. तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकाचेही नुकसान होत असून, कापसावर मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या पावसाने झाडांची खालील पाने लालसर, पिवळी पडत असून, गळत आहेत. तर खोलगट भागातील कापसाची झाडे मर रोगामुळे उन्मळून पडत असल्याचे चित्र आहे. त्याबरोबरच पावसाच्या प्रवाहाचे पाणी शेतीशिवारामध्ये घुसल्याने कापसाची झाडे वाहून गेल्याचेही प्रकार परिसरात घडले आहेत. तरी मूग, उडीद, कापूस आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरींकडून होत आहे.
आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे चित्र असून, कापूस पिकासारख्या नगदी पिकाच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरींच्या चिंतेत भर पडली असून, एकरी उत्पन्नावर खूप मोठा फरक पडणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.