रायंगण येथील दिनकर देवदान मावची यांचा राहत्या घराला बुधवारी सायंकाळी अचानक आग लागल्याचे दिसून आले. काही वेळातच आगीने राैद्र रूप धारण केल्याने घरातील अन्न धान्य, ढोरासाठी चारा आगीत जळून खाक झाले. तसेच आगीत गोठ्यात बांधलेला एक बैल, म्हैस भाजले गेले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रायंगण गावाचे सरपंच नवलसिंग गावित यांनी तत्काळ नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन बंबाला माहिती दिली होती. अग्निशमन बंबाने येथे हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली. रायंगण ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळाल्यानंतर आमदार शिरीषकुमार नाईक यांनी रायंगण गावात येऊन दिनकर मावची यांची भेट घेऊन घराची पाहणी केली. आमदार नाईक यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना पंचनामा करण्याचे सूचित केले होते. यानुसार तलाठी गणेश बेदरकर यांनी घराचा पंचनामा केला. आगीत एकूण अंदाजे १ लाख ५ हजारांचे नुकसान झाले आहे. यावेळी उपसरपंच सुमाबाई गावीत, अनिल गावीत, अतुल ठिंगळे, सुशील गावीत, महेंद्र गावीत यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.
नवापूर रायंगण गावात घराला आग लागून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST