भारतीय हवामान विभागाकडून ९ जून रोजी ३० ते ४० किलोमीटर वेगाचा वादळी वारा, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट सुरू होऊन सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यासह पूर्व भागात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अचानक रात्री सुकनाई नदीला पूर आला. त्यात नदीच्या दुतर्फा असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरून केळी, पपईसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी केली अन् पुराचे पाणी शिरले
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करून केळी, पपईच्या रोपांची लागवड केली होती. सध्या शेतकरी वर्गाकडून पिकांना खत देण्याची लगबग सुरू करण्यात आली होती. परंतु सुकनाई नदीला बुधवारी रात्री अचानक पूर आल्याने शेतात पुराचे पाणी शिरून नुकसान झाले. त्यात मंजूरखा बशीर खान पठाण, माजिद नासीर पठाण, प्रकाश मदन पाटील, भरत मदन पाटील, मेहुल पुष्पराज पाटील, प्रकाश इंदास पाटील, प्रवीण दगा पाटील, विजयाबाई फकीरा पाटील, सुरेश सुदाम पाटील, विमलबाई सुकलाल शिंदे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समजते.