याबाबत वृत्त असे की, पाटबारा, ता. अक्कलकुवा येथील एका रुग्णाला शहादा येथून जीपगाडीने घरी नेण्यात येत होते. पाटबारा गावाजवळ असलेल्या उदय नदीवरील पूल तुटल्याने नदीच्या पात्रातून असलेल्या पर्यायी रस्त्यावरून चालकाने जीप नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीत पाणी असल्याने व चिखलात जीप रुतली. ही घटना सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. जीप रुतल्यानंतर त्याचवेळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. प्रसंगावधान राखत जीपमधील रुग्ण व त्याचे नातेवाईक नदीबाहेर आले. मात्र जीप पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याने पाहून चालकाने जीप नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर गाडी वाहून जात असल्याचे पाहून इतरांनी पाण्यातून चालकाला बाहेर ओढले. त्यामुळे सुदैवाने सर्वांचे जीव वाचले. पुराच्या पाण्यात ही जीप सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहून गेल्याने जीपचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने जीप पाण्यातून बाहेर काढण्यात आली.
पूल तुटल्याने वाहनधारकांचे हाल
अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा ते पाटबारा दरम्यान नुकतेच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले आहे. मात्र पाटबारा गावाजवळ उदय नदीवर असलेला पूल तुटलेला आहे. त्यामुळे नदीपात्रातून वाहनांची ये-जा सुरू आहे. या पुलाचे बांधकामच झाले नसल्याने वाहनधारकांचे पावसाळ्यात हाल होतात. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला की या नदीला पूर येतो. या पुराच्या पाण्यातून वाहन नेणे म्हणजे धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने व ठेकेदाराने या पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे.