लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे : शहादा तालुक्यात गोमाई नदीवर आकांक्षित जिल्हा योजनेअंतर्गत लघु पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) मार्फत बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असून, त्यातील ओझर्टा येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. संबंधित अभियंता व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू असून, या बंधाऱ्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहादा तालुक्याच्या पूर्व भागातील गोमाई नदीवर टुकी, डामळदा, ओझर्टा, जाम, जावदा, नवानगर या ठिकाणी आकांक्षित जिल्हा योजनेअंतर्गत लघु पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) मार्फत लाखो रुपये खर्चाचे सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत. या बंधाऱ्यामुळे अनेक गावांना मोठा फायदा होणार आहे. मात्र संबंधित बंधारे निकृष्ट दर्जाचे व तांत्रिकदृष्ट्या सदोष पद्धतीने होत असल्याने शेतकरी वर्गाकडून तक्रारी येत असल्याने कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
ठेकेदाराने बंधाऱ्याच्या पायामध्ये खोली करून त्यात डबराऐवजी आजूबाजूला कोरून काढलेल्या मुरूमाचे दगड व मुरूमाचा वापर केला आहे व वरून पीचीसी करण्यात येत आहे. जर बंधाऱ्याचे पाणी साठवले, तर साठवणूक केलेले पाणी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने पोकळी निर्माण करेल. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला असता, त्यांनी अभियंत्यांकडे आराखड्याची मागणी केली. परंतु संबंधित अभियंत्यांनी ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा करीत, काय असते ते तरी तुम्हास माहीत आहे का? माझ्याकडे इस्टिमेंट नाही, बंधाऱ्याचे बांधकाम असे नाही, तर कसे होते मग, असे सांगून निघून गेला.
आमदारांची भेट
दुसऱ्यादिवशी शेतकऱ्यांनी शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांना कळविले व लागलीच बंधाऱ्याची पाहणी करण्यास सांगितले. प्रत्यक्ष आमदार पाडवी यांनी बांधकाम स्थळाला भेट दिली असता, त्याचवेळी बंधाऱ्याचे काम करीत असलेले मिस्त्री कच्चा माल टाकताना आढळून आले. त्वरित आमदार पाडवी यांनी संबंधित अधिकारी नीलेश पाटील यांना संपर्क साधून काम बंद करण्याचा आदेश दिला. यानंतर ओझर्टा येथील ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे म्हणून पहारीच्या साह्याने खड्डा खोदून मुरूम बाहेर काढून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, पाण्यामुळे सिमेंट पक्के होत नाही म्हणून कोरले असता, सहज खड्डा झाला, अशी उत्तरे दिली. खरंतर बांधकाम करीत असताना सिमेंटवर पाणी मारले जाते. कारण ते पक्के झाले पाहिजे. मात्र याठिकाणी तर पाणी मारल्याने सिमेंट भुसभुशीत होते. अशा पद्धतीने अधिकारी व ठेकेदार या बंधाऱ्याची कामे करीत असतील, तर नक्कीच बंधारा एका वर्षात जमीनदोस्त होईल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. शेवटी हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्नदेखील ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
ओझर्टा येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून, अधिकारी व अभियंता यांचा मनमानी कारभार सुरू आहे. यात ओझर्टा, भोरटेक, चिखली या गावांच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जर असे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल, तर बंधारे बांधून फायदाच नाही ना. अनेक वर्षांपासून आम्ही बंधाऱ्याची मागणी करीत होतो. आजपर्यंत आम्हाला बंधारा उपलब्ध झाला नसून, जर असे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल, तर आम्ही या बंधाऱ्याचे काम होऊ देणार नाही.
- गोविंदसिंग गिरासे, शेतकरी
ओझर्टा येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, आम्ही ग्रामस्थांनी मिळून काम बंद केले आहे. आम्हा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळावा, यासाठी. यावर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष केंद्रित करावे. - संदीप गिरासे, शेतकरी, ओझर्टा