लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील हलालपूर ते धवळीविहिर दरम्यान नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार व लहान बालक जखमी झाला़ सोमवारी दुपारी ही घटना घडली़प्रकाश बारक्या पावरा रा़ धवळीविहिर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे़ प्रकाश पावरा हे सोमवारी तळोदा येथून किराणा माल घेऊन धवळीविहिर गावी जात होते़ दरम्यान हलालपूर ते धवळीविहिर दरम्यानच्या खड्ड्यात त्यांचा तोल गेल्याने दुचाकीसह ते त्यात पडले़ यात त्यांच्यासह त्यांचा सहा वर्षीय मुलगाही जखमी झाला़ पुलावरून प्रकाश पावरा हे दुचाकीसह खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला़ यावेळी लगतच्या परीसरात असलेल्या मजूर आणि शेळ्या चारणाऱ्या मुलांनी दोघा बापलेकांना मदत करत दुचाकीपासून वेगळे केले़ दोघांनाही जखमा झाल्या़ तसेच किराणा मालाचेही नुकसान झाले आहे़ तळोदा-हलालपूर ते धवळीविहिर दरम्यान पूलाला नदीला आलेल्या पुरामुळे भगदाड पडले आहे़ गेल्या वर्षीच्या पुरात पुलाची दुर्दशा होवून भगदाड मोठे झाले होते़ यामुळे धवळीविहिर ग्रामस्थ गेल्या वर्षभरापासून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत़ खड्ड्यात पडून अपघाताची भिती होती़ दरम्यान सोमवारी दुचाकीस्वार पडल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता़पुलाला पडलेल्या भगदाडाबाबत ‘लोकमत’ने वृत्त देत लक्ष वेधले होते़ यातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांनी पुलाची पाहणी करुन यंत्रणेला सूचना केल्या होत्या़ आमदार राजेश पाडवी यांनीही या भागात भेट देत आढावा घेतला होता़ या पुलाला तांत्रिक मंजूरी मिळून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे़
खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:27 IST