या वेळी बाजरी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता तपासणी चाचणी तसेच रुंद वरंबा सरी पद्धत प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच मंजुळाबाई निंबा पवार व उपसरपंच मनेश पवार यांच्या हस्ते बियाणे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील सोनवणे, अर्जुन पवार, गणेश दिघे, संतोष गांगुर्डे, विष्णू पवार, गुफरान पिंजारी, काशीनाथ गागरे, संजय मराठे, सुरेश पाटील आदी २५ शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी. जोशी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक बी.आर. पावरा यांनी निरोगी पिकांसाठी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक केले. या वेळी खरीप हंगामातील पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे व बियाणे घरचे असो किंवा विकतचे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. खतांचा कार्यक्षम वापर व खत बचतीच्या उपाययोजना सागताना जमीन निर्देशांकानुसारच शेतकऱ्यांनी खत वापरण्याचे नियोजन करावे. महात्मा गांधी ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीबाबतही मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी आर.एम. धनगर यांनी केले. महाडीबीटी पोर्टल योजना ‘अर्ज एक योजना अनेक’, प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना, मकावरील लष्करी अळी, कपाशीवरील गुलाबी शेंदुरी बोंडअळी, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन, व्हर्मी कंपोस्ट नॅडेप कंपोस्टिंग सेंद्रिय शेती आदी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सावखेडा येथे पीक प्रात्यक्षिक व बियाण्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST