नंदुरबार : कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना शहादा येथील ॲपल रुग्णालयाने अशा रुग्णांवर उपचार केल्याचा ठपका ठेवत या रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अशाप्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शहादा येथील खेतिया मार्गावरील ॲपल रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केेले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार प्रांताधिकारी चेतन गिरासे यांनी पथकासह तेथे भेट दिली असता, त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र नभेसिंग वळवी यांनी फिर्याद दिल्यानुसार या रुग्णालयाचे व्यवस्थापक सैय्यद राशिदअली नजीरअली (रा. शहादा) यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करत आहेत.