लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लाॅकडाऊन काळात रिकामे बसून यूट्यूब चॅनेलवर लूट कशी करावी याचे व्हिडीओ पाहून नंदुरबारसह राज्यातील इतर भागात ऑनलाईन वस्तू बुक करुन पैसे न देता वस्तू घेऊन पसार होणार्या तिघांच्या टोळीला नंदुरबार एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. तिघांनी नंदुरबारसह राज्यातील विविध भागात याच प्रकारे चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चेतन राजेंद्र सपकार रा. शिंदगव्हाण ता. नंदुरबार येथील युवकाच्या कुरीयर कंपनीतून शहरातील छोरीया रेसिडेन्सी याठिकाणी ४९ हजार रूपयांचा मोबाईल डिलीवरी करण्याचे काम आले होते. ७ ऑक्टोबर रोजी चेतन हा वस्तूची डिलीवरी करण्यासाठी गेला असता, त्याठिकाणी वस्तू घेणारे म्हणून दोघे डमी ग्राहक आले होते. दरम्यान वस्तू घेऊन दोघांनी तिसर्या व्यक्तीसोबत पळ काढला होता. या प्रकाराने भांबवलेल्या चेतन सपकार याने पोलीसात धाव घेतली होती. घटनेचा तपास पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना सोपवला होता. त्यांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. यात नांदगाव येथून तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच प्रत्येकाच्या नावाने तयार केलेले किमान पाच ते सात आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत. ऑनलाईन गुगल मॅपद्वारे एखाद्या शहराची माहिती घेत एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या नावाने महागड्या वस्तू बुक करुन घरी येऊ पाहणार्या कुरीयर बाॅयला फोन करुन घरी नसल्याचे सांगत एकांत ठिकाणी बोलवत तेथून वस्तू घेऊन पळणे किंवा चलाखीने ती वस्तू काढून घेत त्यात ठोकळा किंवा साबण ठेवून देण्याचा प्रकार तिघे करत होते. कुरीयर बाॅयच्या लक्षात आल्यास त्याला प्रसंगी मारहाण करण्याचा प्रकार तिघे करत होते. तिघांच्या या चोरीच्या पद्धतीने पोलीसही चक्रावून गेले होते. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, पोलीस उपअधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, राकेश मोरे,विजय ढिवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येणार आहेत.
शिक्षणात नापास परंतु चोरीत मात्र पास पोलीस पथकाने नांदगाव येथून सचिन मच्छींद्र राठोड, राहुल मच्छींद्र राठोड दोन्ही रा. पिंपरी तांडा हवेली नांदगाव व सागर नवनाथ चव्हाण रा. चाळीसगाव अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. तिघांचे शिक्षण १० पर्यंत झाले आहे. परंतु लाॅकडाऊन काळात कामधंदा नसल्याने तिघांनी मिळून घरबसल्या एका कुरीय कंपनीची फसवणूक केली होती. तेथे न सापडल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी गेल्या चार महिन्यात मुंबई, बदलापूर, बीड, कोपरगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड याठिकाणी वस्तू बुक करुन पैसे न देता हातचलाखीने पळवल्या होत्या. त्यांच्याकडून एका कारसह ३ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदगाव येथून बुक केलेली वस्तू घेण्यासाठी तिघे आले असताना पोलीसांनी डमी कुरीयर बाॅय पाठवून तिघांना जाळ्यात ओढले होते. तिघे पळून जात असताना पोलीसांनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.