या प्रकरणी वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील लंगडी भवानी वन क्षेत्रात १८ जुलै रोजी शेकडो लोकांच्या जमावाने अमानुषपणे शेकडो झाडांची मोठ्या प्रमाणावर बिनधास्तपणे कत्तल करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यात आला. कत्तल झालेल्या झाडांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यात एकूण एक हजार ७०० झाडांची कत्तल झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, अजूनही अन्य ठिकाणी कुठे झाडे तोडली गेली आहेत का याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे कत्तल झालेल्या झाडांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृक्षतोडीमुळे वन विभागाचे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आल्यानंतर अजून ६० जणांची नावे समोर आली असून, त्यांना अटक करण्यासाठी वन विभागाने कडक पवले उचलली आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
लंगडी वृक्षतोड प्रकरणी झाडांची मोजणी पूर्ण, अजून ६० आरोपींची नावे निष्पन्न, लवकरच अटक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST