मुस्लीम समाजात रमजान महिन्याला पवित्र महिना म्हणून पाळले जाते. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करून मशीदमध्ये पाच वेळा नमाजपठण करून, विशेष तराबेची नमाजही अदा करतात, तसेच पवित्र कुराण ग्रंथाचे महिनाभर वाचन करतात. चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही मुस्लीम बांधवांच्या महत्त्वाच्या सणावर कोरोना संकटाचे सावट आहे. प्रत्येक शुक्रवारची नमाज गर्दी टाळण्यासाठी बहुतांश मुस्लीम बांधव घरीच नमाज अदा करीत आहेत. त्यामुळे मशिदीत होणारी गर्दी खूपच कमी झाली आहे. परिसरातील अनेक मशिदीला सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे टाळे आहे. दरम्यान, मास्कचा वापर, शारीरिक अंतर असे कोविड नियमाचे पालन केले जात आहे.
लॉकडाऊनमुळे बहुतांश मुस्लीम बांधवांना नवीन कपड्यांची खरेदी करता आली नाही. रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी होणाऱ्या इफ्तार पार्ट्या कोरोनामुळे झाल्या नाहीत. रमजान महिन्यात शुक्रवारच्या नमाजला विशेष महत्त्व आहे. असे असतानाही शुक्रवारची नमाजही बहुतांश मुस्लीम बांधवांनी संपूर्ण महिन्यात घरीच अदा केली. ईदची नमाज अदा केल्यानंतर शीर-खुर्माचा आस्वाद घेतला जातो.
हिंदू-मुस्लीम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन शीर-खुर्माचा आस्वाद घेत असतात. कोरोनामुळे अनेकांना शीर-खुर्म्याचा आस्वाद आता घेता येणार नाही, बुधवारी चंद्रदर्शन झाले तर गुरुवारी ईद साजरी होईल, नाहीतर कॅलेंडरनुसार शुक्रवारी होईल.
नियम पाळूनही अत्यावश्यक सेवेच्या काळात खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा अंदाच डॉक्टर व तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. परिणामी, एप्रिल महिन्यात सुरू झालेला लॉकडाऊन १५ मेपर्यंत सरकारने वाढविला आहे.