पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक माहिती देण्यासोबत त्यांच्या समस्या दूर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दररोज दूरध्वनीवरून संपर्क साधणाऱ्या व्यक्तींना माहिती देण्यात येत आहे.
गेल्या पाच दिवसांत २०० हून अधिक नागरिकांनी विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल, रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याची प्रक्रिया, कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता, ई-पास आदी विविध विषयांबाबत विचारणा होत आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून माहिती घेऊन नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न कक्षातील कर्मचारी करीत आहेत.
दररोज दाेन पाळ्यांमध्ये प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कक्षाचे समन्वयन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील करीत असून माहिती विश्लेषण व ई-प्लॅटफॉर्मसाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन यांचे सहकार्य मिळाले आहे. तालुका नियंत्रण कक्षाकडून येणाऱ्या माहितीचे विश्लेषण जिल्हा कक्षाद्वारे करण्यात येते. ही माहिती प्रशासनाला उपाययोजनांसाठी संदर्भ म्हणून उपयोगात आणली जात आहे.
नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ndbcovidinfo.com या संकेतस्थळावरील माहिती कक्षातर्फे दिवसातून दोन वेळा अपडेट करण्यात येते. त्यात रुग्णवाहिका, कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन बेड, लसीकरण केंद्राची माहिती आदी विविध माहितीचा समोवश आहे. हे संकेतस्थळदेखील नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
नागरिकांनी कोविडविषयक माहितीसाठी वरील संकेतस्थळाचा उपयोग करावा अथवा ०२५६४-२१०१२३/२१०२३४/२१०००६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.