साधारण ६० च्या दशकापासून नंदुरबार शहरात चार सिनेमागृहे होती. देशात शुक्रवारी सिनेमा बदलत असला तरी नंदुरबारात मात्र मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी नवा सिनेमा थिएटरमध्ये लावण्याची वेगळी आणि अनोखी परंपरा होती. बदलत्या काळानुसार जागांचे भाव वाढल्याने तीन सिनेमागृहे काळाच्या पडद्याआड गेली. सद्या शहरात अमर चित्रमंदिर हे एकच थिएटर असून त्याचेही नूतनीकरण सुरू असल्याची माहिती व्यवस्थापक रवींद्र सोनार यांच्याकडून देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या या चित्रपटगृहात काम करणारे आठ ते नऊ कर्मचारी हे बेरोजगारीला सामोरे गेले आहेत. येत्या सहा महिन्यात नवीन आणि सुसज्ज असे निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. १९७७ सालापासून सेवेत असलेल्या या थिएटरसोबत नंदुरबार शहरातील अनेकांच्या आठवणी असल्याने त्याची नव्याने उभारणी होत असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान एकीकडे एकपडदा सिनेमागृहांची स्थिती ही गंभीर असताना कधीकाळी भरभरुन चालणारे शहरातील व्हिडीओ मात्र बंद पडले आहेत. नंदुरबारच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आठ ते नऊ व्हिडिओपैकी आता केवळ एकच सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्र शासनाने सिनेमा थिएटर्सचा महसूल गोळा करण्याचे पालिका आणि महसूल प्रशासनाचे अधिकार काढून घेत ते जीएसटीमध्ये वर्ग केल्याने प्रशासनही या वास्तूंचे पुनरुज्जीवन किंवा त्यांच्या उत्थानाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.