नंदुरबार : कोरोनाने जीवनशैली बदलून टाकली. विविध प्रथा, परंपरांनाही फाटा द्यावा लागला किंवा त्यात बदल करावे लागले. इतकेच काय, विविध धार्मिक विधीदेखील कोरोना काळात ऑनलाईन करावे लागल्याचे चित्र होते. विधी तर करावाच लागणार, मग तो ऑनलाईन का न होवो, ही बाब लक्षात घेऊन हा बदलही या काळात स्वीकारण्यात आल्याचे दिसून आले.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रत्येकांमध्ये कोरोनाची भीतीने घर केले होते. काेरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुटी, तर सरकारी कार्यालयातील मनुष्यबळ कमी करून शिक्षक व खासगी व सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य होईल तितके काम ऑनलाईन पध्दतीने करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते.
ऑनलाईन पध्दतीमुळे बहुसंख्य व्यवहार डिजिटल झाले आहेत. कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांचा अंत्यविधी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे, तर लग्नानंतर सत्यनारायण पूजेसाठी नातेवाईकांनी गर्दी न करण्याचे तसेच विधीसाठी बसताना सोशल डिस्टन्स पाळावे व विधीचा कार्यक्रम मोठ्या हाॅलमध्ये किंवा सभामंडपात घेण्यावर अधिक भर दिला गेला.