नंदुरबार : रिमझिम पावसात वाचकांच्या स्नेहरूपी वर्षावात ‘लोकमत’ नंदुरबार कार्यालयाचा २४ वा वर्धापन दिन रविवार, २५ जुुलै रोजी उत्साहात साजरा झाला. यावेळी ‘भरारी कोरोनानंतरची’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत कार्यक्रम उत्साहात झाला.
‘लोकमत’वर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली. पुरवणी प्रकाशन कार्यक्रमास खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार डाॅ. विजयकुमार गावीत, शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होते.
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. हिना गावीत यांनी सांगितले, ‘लोकमत’ नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका बजावत असते. दिल्ली येथे महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी तळमळ असायची परंतु आज दिल्लीतही लोकमत पोहचला आहे. त्यामुळे गावाकडची बातमी वाचण्यास मिळते. जिल्ह्यातील विविध प्रश्न लोकमतच्या माध्यमातून आम्ही जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो. नेहमीच या दैनिकाने एक जागल्याची भूमिका निभावली असून यापुढील काळातदेखील ‘लोकमत’ तळागाळातील जनतेचे प्रश्न आवाज बनून उभा राहील, यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी जिल्हा निर्मितीच्या आधीपासून ‘लोकमत’ने जिल्हा विकासाचे विविध प्रश्न लावून धरले. आदिवासी दुर्गम भागातील दळणवळण, आरोग्य, कुपोषण यांसारखे प्रश्न वृत्तमालिकेद्वारे लावून धरण्यात आले. त्यामुळे अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यासाठी योजना राबवून निधी आणण्याचे काम सोपे झाले आहे. जिल्हा निर्मितीनंतरदेखील ‘लोकमत’ सर्वसामान्यांचा आवाज बनून राहिला आहे. आज एक आघाडीचे वृत्तपत्र म्हणून जिल्हाच नव्हे तर देशात नावलौकिक प्राप्त ठरले आहे. यापुढील काळातदेखील ‘लोकमत’ची भूमिका विकासाभिमुख व लोकाभिमुख राहील, असेही आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी ‘लोकमत’ची नाळ सर्वसामान्य वाचकांशी जुळली आहे. ‘लोकमत’ वाचल्याशिवाय बातमी वाचल्याचे समाधान होत नाही. जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न तडीस नेण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. वाचकप्रिय आणि समाजाभिमुख पत्रकारिता करण्याचे काम अविरत सुरू असून जिल्ह्याच्या अविकसित आणि दुर्गम भागात विशेषण.......................................... खोडून काढण्यासाठी ‘लोकमत’ नेहमीच अग्रेसर राहिला असल्याचेही विजय चौधरी यांनी सांगितले.
प्रास्ताविक कार्यकारी संपादक रवी टाले यांनी केले. ‘लोकमत’ची वाटचाल, जिल्ह्यातील विविध प्रश्नांना फोडलेली वाचा, तडीस नेलेले प्रश्न यांचे विवेचन करून ‘भरारी कोरोनानंतरची’ या पुरवणीमागची भूमिका विशद केली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यात कृषी क्षेत्रात शहादा पालिकेचे नगरसेवक तथा प्राचार्य मकरंद पाटील, जगदीशभाई पाटील- खेडदिगर, ईश्वर माळी- जयनगर, आर. आर. बोरसे-कळंबू, सरपंच वंदना चतुर सावंत- तिलाली, सरपंच राहुल गावीत- बोकळझर, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे- खोकसा, रवी गोसावी- सामाजिक, नगरसेविका योगिता संतोष वाल्हे-शहादा, किरण तडवी- बांधकाम यांच्यासह गेल्या वर्षी उल्लेखनीय कार्य करणारे बांधकाम क्षेत्रातील अविनाश महादू माळी- नंदुरबार, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. रवींद्र पाटील- उद्योजक क्षेत्रातील हेमलता शितोळे-पाटील- शहादा, नंदुरबार, वन व्यवस्थापन क्षेत्रातील एस. आर. चौधरी- नवापूर, उद्योग क्षेत्रातील किशोर पाटील-शहादा यांचादेखील गौरव करण्यात आला. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सक्रिय योगदान देणाऱ्या व्हीएसजीजीएम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील, भाजपचे नेते राजेंद्रकुमार गावीत, डॉ. कांतिलाल टाटिया, शहाद्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, भाजप महिला आघाडीच्या सविता जयस्वाल, किन्नारी सोनार, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक परवेजखान, नगरसेविका मंगलाबाई माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.