महाविद्यालयीन अभिरूप न्यायलय स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्यार्थी कल्याण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन अभिरुप न्यायालय स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश मलीये, अक्कलकुवा येथील दिवाणी न्यायाधीश ए.डी. करभाजन, नंदुरबार जिल्हा सरकारी वकील अॅड.सुशील पंडित, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी न्या.प्रमोद तरारे यांनी वकिलांना केवळ कायद्याचे ज्ञान असून, चालत नाही तर त्या ज्ञानाच्या वापराचे कौशल्य हे अधिक महत्त्वाचे असते. विद्याथ्र्यानी कायदा शिक्षण घेताना केवळ पुस्तकी अभ्यास न करता कौशल्य गुण वाढविले पाहिजेत असा संदेश दिला. जिल्हा सरकारी वकील अॅड.सुशील पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील विधी महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात धुळे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे एस.एम. बियाणी विधी महाविद्यालयाला प्रथम तर नंदुरबार विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्थेच्या महाविद्यालयांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. यातील स्पर्धकांना न्या.ए.डी. करभाजन व अॅड.सुशील पंडित यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.