शहादा शहर व परिसरात पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी तुंबून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. डोंगरगाव रोडकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी सरळ डोंगरगाव रोडमार्गे शहरात शिरते व अनेक वसाहतींमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते.
मागीलवर्षी जोरदार पाऊस झाल्याने डोंगरगाव रोड चौफुली परिसर, हॉटेल रेसिडेन्सी, शहादा न्यायालय, पुरुषोत्तम मार्केट, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाले होते. यावर्षी असे पाणी साचू नये म्हणून डोंगरगाव रोडकडून येणाऱ्या मुख्य पाट व शहरातील सर्वच मुख्य गटारींची स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते आता पूर्णत्वास आले आहे.
स्वच्छतेवेळी मुख्याधिकारी राहुल वाघ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, परेश पवार, गणेश डांबरे, गणेश बाशिंगे, गोपाळ कोळी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.