तळोदा : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाने तातडीने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भोई समाज पंच मंडळाने केली आहे.
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकास निवेदन देण्यात आले आहे की, सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता सरकारनेच व्यक्त केली आहे. साहजिकच समाजामध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण करून घेण्याकडे नागरिकांचा प्रचंड कल वाढला आहे. शहरातील बहुसंख्य नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात जात आहेत. नेमकी तेथे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना गैरसोयीस तोंड द्यावे लागत आहे. वास्तविक लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन नागरिकांमध्ये जनजागृती करून लस घेण्याची विनंती करीत आहे. तर दुसरीकडे आता नागरिक स्वतःहून तयार झाले असताना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना लस मिळत नसल्याचा आरोप आहे. विशेषत: इतरांनी पहिला डोस कोविशिल्डचा घेतलेला असताना दुसऱ्या डोसची तारीख येऊनदेखील मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कोविशिल्ड लस उपलब्ध करावी, अशी मागणी भोई समाज पंचाचे धनालाल भोई, संतोष भोई, शिवदास भोई, चंद्रकांत भोई, सचिन शिवदे यांनी केली आहे.