नंदुरबार : ग्राहकांकडून वीजबिल वसुलीचे तब्बल २६ लाख ८८ हजार ८९२ रुपये वीजभरणा केंद्रातून बँकेत जमा करणे आवश्यक असताना ती न भरल्याने वीज कंपनीच्या सहायक लेखापालाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली आहे.
जितेंद्र गुुलाब ठाकरे, सहायक लेखापाल, नंदुरबार असे संशयिताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, जितेंद्र ठाकरे हे वीज कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता, नंदुरबार उपविभाग येथे रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वीज भरणा केंद्राचा पदभार होता. मे २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळात त्यांच्याकडे ग्राहकांचे तब्बल २६ लाख ८८हजार ८९२ रुपये वीजबिलापोटी जमा झाले होते. त्यांनी बिल भरल्याची पावतीदेखील ग्राहकांना दिली होती. परंतु प्रत्यक्षात वीजबिल भरणाची रक्कम त्यांनी देना बँकेतील वीज कंपनीच्या खात्यावर भरलीच नाही.
ही बाब वीज वितरण कंपनीच्या संगणकीय प्रणालीत लक्षात आल्यावर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज अजबराव दुपारे यांनी फिर्याद दिल्याने जितेंद्र ठाकरे यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर करीत आहे. संशयित रोखापाल ठाकरे यांना अटक करण्यात आली आहे.