याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सोनार गल्लीत राहणारे प्रसाद सतीश सोनार (५२), रक्षा प्रसाद सोनार (४८), भारतीबाई सतीश सोनार (७२), दक्ष प्रसाद सोनार व दर्शिका प्रसाद सोनार हे सोनार कुटुंब सकाळी पावणेबारा वाजेदरम्यान नंदुरबारकडे कारने (क्रमांक एम.एच. ०४- सीझेड १७९४) प्रकाशा रस्त्याने जात होते. राजरंग हॉटेलजवळ प्रकाशाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेरनरने (क्रमांक पी.बी.१३ - बीएफ ९८२७) कारला धडक दिली. या अपघातात सोनार कुटुंबातील पाचही जणांना डोक्याला, पायाला व हाताला मार लागून गंभीर जखमी झाले. यात भारतीबाई सतीश सोनार यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे १८ ते २० टाके पडले आहेत.
समोरून कंटेनर येत असल्याचे लक्षात येताच प्रसाद सोनार यांनी वाहनाचा वेग कमी केला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. घटना घडताच प्रसाद सोनार यांनी शहरातील नातेवाईक व मित्रांना भ्रमणध्वनीने संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सोनार गल्लीतील मित्रमंडळी व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात एवढा भयानक होता की, या अपघातात आपण वाचणार नाही असेच वाटत होते, अशी प्रतिक्रिया प्रसाद सोनार व त्यांच्या आई भारतीबाई सोनार यांनी दिली.
शहादा-प्रकाशा रस्त्याचे नूतनीकरण झाल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या आजूबाजूला संरक्षक कठडे नाहीत, कुठेही नियंत्रण किंवा रस्ते वाहतुकीच्या नियमाचे पालन करणारे फलक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या रस्त्यावर संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.