तळोदा : संरक्षण भिंत नसल्याने तळोद्यातील बसस्थानक वाºयावर असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे़ त्यामुळे याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची मागणी होत आहे़तळोदा येथील बस स्थानक अनेक समस्यांनी सध्या चर्चेत आहे़ या ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम अद्याप झालेले नाही़ त्याचत स्थानकाची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे़ येथे नियमित पध्दतीने स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून येत असतो़ त्यामुळे साहजिकच दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक दाबून बसची वाट पाहण्याची वेळ आलेली आहे़ पिण्याच्या पाण्याच्या टाकीचीही मोठ्या प्रमाणात दैनावस्था झालेली आहे़ टाकीला लावण्यात आलेल्या नळाच्या तोट्या जिर्ण झालेल्या आहेत़ त्यामुळे साहजिकच नळ गळके झालेले आहेत़ टाकीच्या दुरावस्थेमुळे साहजिकच रोजच पाण्याची नासाडी होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे़ याबाबत प्रवाशांकडून वारंवार प्रशासनाला अर्ज-फाटे करण्यात आलेले आहेत़ परंतु याची दखल मात्र कोणीही घेतलेली नाही़ बसस्थानकाची प्रचंड दुरावस्था झालेली असताना तशाच परिस्थितीत विद्यार्थी तसेच इतर प्रवासी हे सर्व सहन करीत आहेत़ या ठिकाणी मुलभूत सोयी-सुविधांची वाणवा असल्याने प्रवाशांकडून प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे़ एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत अनेक वेळा बस स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असते़ परंतु यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असतो़
तळोद्यात संरक्षण भिंतीअभावी बसस्थानक वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 20:45 IST