शेत शिवारामध्ये शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवत साथ देणाऱ्या सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांकडून या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी झालेली नसल्याचे दिसून येते. शहादा शहरात विविध भागातून पोळा या सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी व वर्षभर लागणाऱ्या इतर वस्तू विक्रीसाठी विक्रेते दाखल झाले आहेत. मात्र शेतकरी बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी अजून आला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मागीलवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे भीतीचे वातावरण होते. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने वारंवार लॉकडाऊन घोषित करण्यात येत होते. त्याचा परिणाम यावर्षीही सर्व सण-उत्सवांवर दिसून येत आहे. पोळा हा सण काही दिवसांवर आला असूनही कोरोनाचा प्रभाव कमी झाला असूनही शेतकरी शहरात खरेदीसाठी येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे बैलांसाठी लागणारे विविध साहित्य व साज विक्रेत्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
दरवर्षी पोळा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी साहित्य खरेदी करण्याची लगबग असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे शेतकरी बाजारपेठेत दिसत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील बद्रीझिरा बैलांसाठी लागणारा साज बनविण्यासाठी संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध आहे. मात्र आता शेतीतदेखील पशुधन कमी होत चालले असून शेतीची कामे आधुनिक यंत्राने करण्याची ओढ असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून कमी प्रमाणात वस्तू तयार होतानाचे चित्र आहे.