देशात सरासरी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात साखरेचे उत्पादन घेतले जाते. खासगी व सहकारी साखर कारखाने, खांडसरी यांच्या माध्यमातून साखर उत्पादित केली जाते. साखरेचा वापर फक्त खाद्यपदार्थातच नाही तर इतर उद्योगांतही केला जातो. साखरेवर रासायनिक प्रक्रिया करून हजारो पदार्थ तयार करतात. प्लॅस्टिक, औषध निर्मिती, शीतपेये, सिमेंट, विद्युत विलेपन, गोंद, चर्मोद्योग, स्फोटक पदार्थ, शवसंलेपन, खते अशा अनेक उद्योगांत साखरेचा उपयोग होतो.
जिल्ह्याला दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल साखर लागते. श्रावण महिन्यात साखरेची मागणी वाढल्याने दररोज नियमित मागणीपेक्षा २०० क्विंटलची वाढ अपेक्षित असून साधारणत चार हजार २०० क्विंटल दररोज साखरेचा खप आहे.
का वाढले दर
जुलै महिन्यापर्यंत साखरेच्या दरात किरकोळ भाववाढ होती. मात्र श्रावण महिन्यात मागणी वाढल्याने व पुरवठा कमी झाल्याने साखरेचे भाव वाढत आहेत. अनियमित पर्जन्यमानामुळे साखरेच्या उत्पादनावर फरक पडला असून, याचा फटका भाववाढीच्या स्वरूपात सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच साखरेच्या दरात वाढ सुरू झाली आहे.
-भरत ओस्तवाल, व्यापारी, शहादा
मोठ्या व्यापाऱ्यांकडून ज्या प्रमाणात पुरवठा केला जातो त्यावर साखरेचे दर अवलंबून असतात. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत साखरेच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मातील पवित्र सणांना सुरुवात होते. परिणामी साखरेला सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. नाशिक, नगर व इतर राज्यातून आपल्या भागात साखरेचा पुरवठा होतो.
-राजेंद्र अग्रवाल, व्यापारी, शहादा
साखरेचे दर प्रति क्विंटल
जानेवारी ३००० रुपये
फेब्रुवारी ३००० रुपये
मार्च ३००० रुपये
एप्रिल ३१०० रुपये
मे ३२०० रुपये
जून ३३०० रुपये
जुलै ३३५० रुपये
ऑगस्ट ३६०० रुपये
महिन्याचे बजेट वाढले
दररोज साखर लागते. श्रावणात साखरेचा वापर अधिक प्रमाणात होतो. मात्र दर वाढल्याने नियमित आर्थिक बजेटमध्ये फरक पडला आहे. नेमके सण उत्सव सुरू होतानाच भाव वाढ कशी होते हा प्रश्न नेहमी सतावतो. महागाई वाढली तरी परंपरेनुसार सण उत्सव साजरे करावेच लागतात.
-मनीषा संदानशीव, शहादा
अचानक साखरेच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक बजेट थोडेसे बिघडले. बाजारात सहज साखर उपलब्ध होत असल्याने ती मोठ्या प्रमाणात साठवणूक करणे शक्य होत नाही. परिणामी साखरेचे दर वाढले तरी ती खरेदी करावी लागते. नियमित साखरेचा वापर होत असल्याने दरवाढ ही सहन करावी लागते.
-सेजल पाटील, शहादा