नंदुरबार : नंदुरबार एमआयडीसीमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क व मेडिकल इक्विपमेंट पार्क आणण्यासाठी आपला प्रयत्न असून त्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. हिना गावीत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, नंदुरबार एमआयडीसी विकसित होत आहे. या ठिकाणी अद्याप उद्योग येत नाहीत. उद्योग आणण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे आपण मेगा टेक्स्टाईल पार्क मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. प्राथमिक स्तरावर त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला आहे.
याशिवाय विविध वैद्यकीय उपकरणे भारतातच तयार करण्यासाठी केंद्र सरकारचे नियोजन आहे. त्यासाठी देशात काही ठिकाणी मेडिकल इक्विपमेंट पार्क तयार करण्यात येत आहे. अशा ठिकाणी अगदी लहान वैद्यकीय उपकरणापासून मोठे उपकरण तयार होणार आहेत. यासाठी असलेल्या विविध अटी व नियमांमध्ये नंदुरबार जिल्हा पुरेपूर बसत आहे. शिवाय आकांक्षित जिल्हा असल्यामुळे त्याचाही फायदा होणार आहे. यासाठी आपला पाठपुरावा राहणार असून हे दोन्ही प्रकल्प नंदुरबारात आल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी गेल्या सात वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
तळोदा येथे शनिवारी झालेल्या अपंगांना साहित्य वितरण कार्यक्रमात एकही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता. याबाबत छेडले असता त्यांनी सांगितले, जिल्ह्यातील काही अधिकारी आपला कार्यक्रम होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्रमांना उपस्थित राहू नयेत म्हणून सूचना दिल्या जातात. कालचा प्रकार देखील त्यातलाच एक होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.