शहरातील श्री मोठा मारोती मंदिर सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिराचा प्रारंभ वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ. राजेश वळवी, रक्तपेढीचे डॉ. सुधीर देसाई, हिंदू सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, आदी उपस्थित होते. संपूर्ण जगावर घोंगावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. याचे महत्त्व जाणून व कोरोनाचे सर्व नियम पाळत तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नंदुरबार शहराबरोबर तालुक्यातील वावद, रकासवाडे, भोणे या ग्रामीण भागातून रक्तदान करण्यासाठी तरुण पुढे आले होते. ३८ दात्यांनी शिबिरात रक्तदान केले. तीन महिलांनीही रक्तदान केले. दोन भाऊ-बहीण ४५ किलोमीटर लांबून जैताणे येथून खास रक्तदान करण्यासाठी आले होते. रक्तदात्यांना हिंदू सेवा साहाय्य समितीकडून कोरोना योद्धा कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कृतज्ञता सन्मानपत्र शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी व श्री मोठा मारोती मंदिर संस्थान यांचे सहकार्य मिळाले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सुमित परदेशी यांच्यासह जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, रणजित राजपूत, मयूर चौधरी, चेतन राजपूत, राजू चौधरी, सुयोग सूर्यवंशी, कपिल चौधरी, आकाश गावित, आशिष जैन, आदींनी परिश्रम घेतले. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीकडून डोनर कार्ड व प्रमाणपत्र देऊन दात्यांचा गौरव करण्यात आला. सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन व शासनाच्या नियमांचे पालन करीत काळजी घेण्यात आली.
नंदुरबार येथील शिबिरात ३८ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST