जिल्हा भाजपची महत्वपूर्ण बैठक तळोदा येथील आदिवासी भवनात बुधवारी जिल्हाध्यक्ष विजय चाैधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार डाॅ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, महाविकास आघाडीकडून आदिवासी समाजावर होणारा अन्याय, राज्यातील दलित समाजावरील अत्याचार, व्यापारी, शेतकरी वर्गाची पिळवणूक आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी हे आंदोलन होणार आहे. यांतर्गत शनिवारी सकाळी १० वाजता नंदुरबार शहरातील धुळे चौफुली, शहादा येथील दोंडाईचा रोड याठिकाणी रास्ता रोको आणि निदर्शने करण्यात येणार आहेत.
आघाडी सरकार ओबीसी वर्गाच्या समस्या आणि मागण्यांविषयी संवेदनशील नाही, यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय चाैधरी यांनी दिली आहे. आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे कळवण्यात आले आहे.