नंदुरबार : गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यातून फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहेत. यात प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याचे प्रकार राज्यातील विविध भागात घडत आहेत. नंदुरबारातही तीन वर्षांत अशा प्रकारची एक घटना घडल्याची माहिती असून, अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडू नयेत, यासाठी सायबर सेलकडून सातत्याने तपास करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीतून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने नोकरीचा संदेश देत पैसे भरण्याचे आमिषही काहींना देण्यात आले आहे. परंतु, अनेकांनी याची पडताळणी केल्याने त्यांची फसवणूक टळली आहे. दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणारे गुन्हेगार बेरोजगार युवकाने विविध वेबसाईटवर केलेले अर्ज, नोंदण्या, नोकरीची मागणी याचा आढावा घेत हॅकिंग करून मोबाईल क्रमांक मिळवत फोन करतात. यातून पैशांची मागणी करून नोकरी देतो असे सांगून फसवणूक केली जाते.
एखाद्या बेरोजगार युवकाला वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळत असेल तर त्या वेबसाईटची संपूर्ण माहिती संबधित युवकाने ऑनलाईन पद्धतीने तपासून घेतली पाहिजे.
नोकरीसाठी एखाद्या ऑनलाईन पोर्टलवरून पैसे मागणी केल्याचा मेल, फोन किंवा सोशल मीडियातून संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे.
एखाद्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पैसे गुंतले किंवा सातत्याने मागणी होत असेल तर अशा वेळी पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देणे आवश्यक आहे.
नंदुरबार जिल्ह्यात २०१८ मध्ये नवापूर येथील एका युवतीकडून एअर होस्टेस पदासाठी एक लाख रुपयांची मागणी झाली होती. युवतीने पैसे दिल्यानंतर नोकरी न मिळाल्याने तिने सायबर सेलकडे धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातून परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. यासाठी त्यांच्याकडून विविध वेबसाईट्सवर नोंदण्या केल्या गेल्या आहेत. या नोंदणीतील माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळे युवकांनी योग्य त्या सर्टीफाईड वेबसाईटवरच माहिती नोंदवून घ्यावी.
विविध बँकांच्या जाहिराती तसेच रेल्वे भरती बोर्डाच्या जाहिराती सातत्याने काढल्या जातात. या सर्व परीक्षा ऑनलाईन असतात. यासाठी नोंदणी करत असताना अनेक फेक वेबसाईट्स अर्ज भरताना सुरू होतात. कोणत्याही शासकीय, बँकिंग किंवा परीक्षेचा अर्ज भरताना वेळोवेळी येणाऱ्या इतर वेबसाईट्सच्या पाॅप-अप वेबसाईट्सला आधी ब्लाॅक केले पाहिजे. यातून माहिती सुरक्षित होते.
बेरोजगार युवकांना ऑनलाईन संपर्क करून त्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे टाळण्यासाठी युवकांनी संकेतस्थळ तसेच ज्याठिकाणी नोकरी मिळणार आहे, त्याची माहिती घेतली पाहिजे. सत्यता पडताळून पैशांची मागणी होत असल्याचे तेथे कळविले पाहिजे.
- रवींद्र कळमकर
पोलीस निरीक्षक, सायबर सेल.