नंदुरबार : सासूने वेळेत स्वयंपाक केला नाही, त्याचा राग येऊन जावयाने सासू व सासरे यांना बेदम मारहाण केल्याची घटना सावरादिगर, ता.धडगाव येथे घडली. सासू, सासरे जखमी झाले असून जावयाविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सावरादिगरचा कारभारीपाडा येथील भीमसिंग रोहिदास पावरा हे आपल्या सासऱ्याच्या घरी गेले. तेथे त्यांनी स्वयंपाक बनविण्यास सांगितले. परंतु स्वयंपाकाला वेग लागल्याने जावई भीमसिंग याचा राग अनावर झाला. त्याने सासरे लोटन धनाज्या पावरा यांना शिवीगाळ करून बेदम मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी सासू तारकीबाई लोटन पावरा या मध्यस्थी करण्यास गेल्या असता त्यांना देखील काठीने बेदम मारहाण करून खाली पाडले. त्यात त्यांचा हात फॅक्चर झाला. दोघांना धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत लोटन पावरा यांनी फिर्याद दिल्याने भीमसिंग पावरा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार काशीनाथ सावळे करीत आहे.