शहादा तालुक्यात एकूण १ लाख ३४ हजार ९९२ लोकांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. तालुक्यात एकूण १५ शासकीय व तीन खासगी रूग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्व लसीकरण केंद्रातून ८५ हजार ८८३ म्हणजे सुमारे ६३.६२ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे तर १८ हजार ४३१ म्हणजे १३.६५ टक्के लोकांचा दुसरा डोसही घेतला गेला आहे. तालुक्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्व केंद्रांवर लस संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेले असता लस संपल्याचे फलक बघून माघारी यावे लागते. अनेक केंद्रांवर नागरिक लस मिळेल म्हणून प्रतीक्षा करतात. मात्र लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच परत यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहाद्यात नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST