नंदुरबार : जिल्ह्यात सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या व खासगी प्राथमिक शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विविध कारणांमुळे ७६ शाळा बंद राहिल्या तर १,४३० शाळा सुरू झाल्या. विशेष म्हणजे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी उपस्थिती मात्र, ४० टक्के राहिली. दरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळत शाळा सुरू झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करणारा नंदुरबार एकमेव जिल्हा ठरला आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला नववी ते बारावी व नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. शासनाच्या आदेशान्वये महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत. केवळ प्राथमिक शाळा बंद होत्या. काही शाळांमध्ये ॲानलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. परंतु धडगाव व अक्कलकुवासारख्या दुर्गम भागात इंटरनेटच्या सुविधेचा अभावामुळे ॲानलाइन शिक्षण बारगळले आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय दुर्गम भागात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील फारसा नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारुड यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची सोमवार, ८ मार्चपासून अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद
शाळा सुरू करण्याचा निर्णयाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. ९३ केंद्रातील १,५०६ शाळांपैकी १,३४० शाळा सुरू झाल्या. तर ७६ शाळा या गावात कोरोना रुग्ण तसेच शहरी भागात असल्यामुळे बंद राहिल्या. तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळांमध्ये नंदुरबार तालुक्यात १४ केंद्राअंतर्गत २०२ शाळांपैकी १९० शाळा सुरू झाल्या. नवापूर तालुक्यात १९ केंद्राअंतर्गत २७० शाळांपैकी २५४ शाळा सुरू झाल्या. शहादा तालुक्यात १८ केंद्राअंतर्गत २७१ शाळांपैकी २४२ शाळा सुरू आहेत. तळोदा तालुक्यात नऊ केंद्राअंतर्गत १५१ शाळांपैकी १३२ शाळा सुरू झाल्या तर अक्कलकुवा तालुक्यात १९ केंद्राअंतर्गत ३२३ शाळांपैकी सर्व तसेच धडगाव तालुक्यात १४ केंद्राअंतर्गत २८९ शाळांपैकी सर्वच शाळा सुरू झाल्या.
७६ शाळा बंद
विविध कारणांनी ७६ शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यात सर्वाधिक शहादा तालुक्यातील २९ शाळांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील त्या गावांमध्ये कोरोना पेशंट सक्रिय असल्याने त्या शाळा सुरू न करण्याच्या सूचना होत्या. नंदुरबार तालुक्यातील १२ शाळा देखील सुरू झाल्या नाहीत या १२ गावांमध्येही कोरोना पेशंट सक्रिय आहेत. नवापूर तालुक्यातील १६ शाळा बंद राहिल्या. त्यातील १४ शाळा या शहरी भागात येत असल्याने बंद ठेवण्याचा निर्णय आहे तर दोन पैकी एका खासगी शाळेचा अहवाल शिक्षण विभागाला मिळालेला नाही. तळोदा तालुक्यात १९ शाळा बंद राहिल्या त्या सर्व शहरी भागात येत असल्यामुळे त्या सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना नियमांचे पालन
शाळा सुरू करतांना अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क वाटप केले. शाळेत सॅनिटायर तसेच हात धुण्यासाठी साबण व पाण्याची सोय करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन विद्यार्थ्यांना शाळेत बसविले जात आहे.