नंदुरबार : बनावट कागदपत्रे तयार करून शाळा सुरू असल्याचे भासवून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुमारे एक कोटी रुपयांचा पगार काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षकेच्या फिर्यादीवरून नवापाडा, ता. अक्कलकुवा येथील संस्थाचालकांसह सहा जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार,सातपुडा आदिवासी लोकसेवा मंडळ राजमोही संचलित नवापाडा, ता. अक्कलकुवा येथे माध्यमिक विद्यालय आहे. या संस्थेचे संचालक युवराज अभिमन्यू वळवी, संदीप अभिमन्यू वळवी, हर्षल अभिमन्यू वळवी (सर्व रा.तळोदा), वासुदेव निंबा मिस्तरी, (रा.तळोदा), दीपक यशवंत पाडवी, (रा.कडवामहू, ता.अक्कलकुवा), यमुना रमेश वळवी (रा.खापर) यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सेवानिवृत्त शिक्षिका कुमुदिनी वळवी-पाडवी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संस्थेने खोटे ठराव करून, खोटे हजेरी मस्टर व कागदपत्र तयार करून शासनाकडे सादर केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा २००८ ते २०२० या दरम्यानची सुमारे एक कोटी रुपये पगाराची बिले काढण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी नंदुरबार व शिक्षण उपसंचालक नाशिक यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून, मुख्याध्यापकाला दमदाटी करून सह्या करण्यास भाग पाडण्याची शक्यता असल्याचे सेवानिवृत्त शिक्षिका कुमुदिनी वळवी-पाडवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सहाही जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुरेश चौधरी करीत आहे.