नंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे गेल्या वर्षात नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. यातून १६ हजार २८७ बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. या कामगारांना शासनाकडून लाॅकडाऊनमध्ये दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने ही रक्कम वितरित करण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यात गेल्या वर्षात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात बांधकाम मजूर, प्लंबर, लिफ्ट मेंटेनन्स, टाइल्स फिटिंग, ब्रिकवर्क, पीओपी, इलेक्ट्रिकल, आदी छोटी-मोठी कामे करणाऱ्या असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे. नोंदणीनंतर मंडळांच्या योजनांचे लाभ, तसेच अनुदान कामगारांच्या बँक खात्यात जमा केले गेले होते. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बांधकामे व त्या संदर्भातील इतर कामे बंद करण्यात आली होती. यातून कामगारांची उपासमार होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने कामगारांच्या खात्यांवर दीड हजार रुपये देण्याचे निश्चित केले होते. बांधकाम कामगार मंडळामार्फत ही रक्कम सध्या कामगारांच्या खात्यावर टाकणे सुरू आहे. यातून अनेक लाभ मिळत आहे. जिल्ह्यात एकीकडे कामगारांची नोंदणी झाली असताना बिगर नोंदणी झालेल्या कामगारांची संख्या ही १० हजारांच्या घरात असल्याची माहिती बांधकाम ठेकेदारांकडून देण्यात आली. विविध भागात हे मजूर कार्यरत आहेत. विशेष बाब म्हणजे नोंदणी केलेल्या कामगारांना अवजारे खरेदीसाठी आणि सुरक्षेसाठी अर्थसाह्य गेल्या वर्षी करण्यात आले होते. दरम्यान, याबाबत बांधकाम कामगार अधिकारी रुईकर यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
बांधकाम कामगार म्हणून गेल्या वर्षी नाव नोंदणी केली होती. त्यावेळी सुरक्षेची साधने मिळाली होती. परंतु, आता काम नसल्याने शासनाने दीड हजारांची रक्कम खात्यावर जमा करावी, शासनाने वाढीव रक्कम किंवा आणखी दोन महिने पैसे द्यावेत.
- किसन पाडवी, मजूर, नंदुरबार
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे. शासनाकडून दीड हजार रुपये मिळाले आहेत. परंतु, लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यातून प्रशासनाने योग्य त्या प्रकारे निर्णय घेत रक्कम वाढवून दिल्यास अनेक समस्या दूर होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.
-राजू गावित, मजूर, नंदुरबार,
छोटी-मोठी कामे कधी सुरू, तर कधी बंद असतात. साईटवर गेल्यावर काम बंद असल्यास ठेकेदारांचाही नाइलाज होतो. नोंदणी केली होती; परंतु अद्याप रक्कम मिळालेली नाही. येत्या आठवड्यात हे पैसे मिळावेत.
-संजू पावरा, मजूर, नंदुरबार,