नंदुरबार : कोरोनामुळे शासकीय कार्यालयांत कर्मचारी उपस्थितीबाबत नियमावली लागू होती. १ जूनपासून ही नियमावली रद्द होऊन पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू होण्याची अपेक्षा होती; परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी मात्र अजूनही कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याचे समोर आले आहे. यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश असून, सध्या येथे ड्रायव्हिंग टेस्ट, अपाॅइंटमेंट आणि वाहन नोंदणीबाबत यथातथाच काम सुरू असल्याचे दिसून आले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गत दोन महिन्यांपासून अर्ध्या कर्मचारी संख्येवर सुरू होते. यातून नवीन वाहनांची नोंदणी, नवीन ड्रायव्हिंग लायसन्स, जुन्या लायसन्सचे नूतनीकरण, आदी कामे पूर्णपणे थांबली होती. एक जूनपासून लाॅकडाऊन संपुष्टात आल्यानंतर याठिकाणी कामांना गती येण्याची अपेक्षा होती; परंतु कामे होत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. दरम्यान, बुधवारीही याठिकाणी कामांना गती आल्याचे दिसून आले नाही. यातून नागरिकांची फिरफिर सुरूच होती.
ओटीपीची अडचण
नवीन वाहन परवाना किंवा नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपाॅइंटमेंट घ्यावी लागते. अर्ज दाखल केल्यानंतर पाच मिनिटात ओटीपी आल्यानंतर तातडीने अपाॅइंटमेंट दिली जाते; परंतु नंदुरबार जिल्ह्यातून चाचणीसाठी अपाॅइंटमेंटसाठी अर्ज केल्यानंतर ओटीपी येण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. खासकरून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात ही समस्या अधिक आहे.
कोटाही कमी
नंदुरबार जिल्ह्यासाठीचा दैनंदिन लायसन्सिंगचा कोटा हा ५० पेक्षा अधिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा कोटा वाढावा यासाठी अपाॅइंटमेंट पद्धतीत बदल करून ओटीपी देणे रद्द करण्याची गरज आहे. असे झाल्यास जिल्ह्याचा कोटा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात वाहन परवान्यांसाठीची शिबिरेही होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोविड नियमावलीचे पालन करून ही शिबिरे होऊ शकतील.
कामे सुुरू केल्याचे आरटीओंचे म्हणणे
दरम्यान, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांना संपर्क केला असता, ते नाशिक येथे असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी कार्यालयातील विविध कामांना गती देण्यात आल्याचे दिसून आले. यात चाचण्यांना वेग दिल्याचे समोर आले.