मोहरम महिन्यांतर्गत १८ ऑगस्ट रोजी ‘शहादत की रात’ तसेच १९ रोजी ‘ योम-ए-आशुरा’ या निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात; परंतु केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नाही. खासगी मातमदेखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनीदेखील एकत्रित मातम, दुखवटा करू नये. वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढू नयेत. सबील, छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविडसंदर्भात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. छबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. सध्या लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशानुसार आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सर्व निर्बंध कायम लागू राहतील. त्यामध्ये मोहरमनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.
मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST