लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील जनता पार्क परिसरात एका ५५ वर्षीय पुरूषाचा तपासणी अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच जनता पार्कमधील परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आला.शहरातील मंगलदास पार्क व जनता पार्क हा भाग एकमेकांना जोडलेला आहे. मंगलदास पार्क मधील ६५ वर्षीय वृध्दा कोरोना पाझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या परिवारातील ११ जण व विसरवाडी येथील चार जण असे एकूण १५ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या पैकी विसरवाडी येथील एक महिला व जनता पार्कमधील ५५ वर्षीय पुरूष अश्या दोघांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यापैकी ५५ वर्षीय रूग्णावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्यांचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पाझिटीव्ह आल्याने प्रशासनाने रात्रीच प्रतिबंधात्मक कारवाई करून परिसर सील केला. गेल्या १० दिवसात शहरात पॉझिटीव्ह झालेल्या दोन रूग्णांची नोंद झाल्याने शहराच्या चिंता वाढल्या आहेत. जनता पार्कचा तो परिसर सील करण्यात आला असून, आजूबाजुचा परिसर बफर झोन राहणार आहे. उर्वरित १३ जणांची प्रकृती स्थिर असून, त्यांना विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याच दरम्यान जैन मंदीर परिसरातील एकास अचानक त्रास झाल्याने धावपळ झाली. वैद्यकीय तपासणीअंती त्याच्यात संशयित लक्षणे नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र खबरदारी म्हणून त्यास सात दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन करण्यात आले.कोरोना बाधित रूग्णांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी बुधवारी तहसीलदार सुनीता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, आरोग्य अधिकारी शशिकांत वसावे व पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे पथक जनतापार्र्क परिसरात रात्री उशिरापर्यंत थांबून होते. जनता पार्क व मंगलदास पार्क या परिसरात पोलीस विभाग व आरोग्य विभागाचा राबता वाढविण्यात आला असून, नागरिकांच्या आरोग्याची दैनंदिन तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
नवापुरात आणखी एक रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:45 IST