लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील बहिरपूर येथे सुरू असलेले अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील बहिरपूर येथे जिल्हा परिषदच्या आदिवासी उपयोजनेच्या महिला व बालविकास अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून कामासाठी नाल्यातील वाळू वापरणे, सिमेंटचा अत्यल्प वापर, लोखंडाच्या साईज कमी, बांधकामाचे क्यूरिंग न करणे यासारखे प्रकार झालेले आहेत. बांधकाम झालेल्या भिंतीवर एकही दिवस पाणी मारलेले नाही. दोनवेळा पाऊस झाला तेच काय पाणी सिमेंटला मिळाले, असे शेजारी सांगत आहेत. त्यामुळे ही इमारत किती दिवस टिकेल याची शाश्वाती नाही. जिल्हा परिषदेच्या आदिवासी विकास उपयोजनेतील निधीतून सुरु असलेल्या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असून याकडे पंचायत समितीचे अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताने हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करीत बांधकाम दर्जेदार करण्याची ामागणी उपसरपंच सूरज जीवन पवार, ग्रा.पं. सदस्य युवराज सत्तरसिंग ब्राह्मणे, अजित नवलसिंग ब्राह्मणे, जितेंद्र भरत पवार, विशाल प्रीतम खेडकर, नवलसिंग आठ्या ब्राह्मणे, शांतीलाल द्वारका ब्राह्मणे, दौलत सुभाष पाडवी व ग्रामस्थांनी केली आहे.