मनोज शेलार।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किसान सन्मान निधीचे जिल्ह्यात तब्बल एक लाख २८ हजार शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी एक हजार ७४६ शेतकरी पडताळणीत अपात्र ठरले असून त्यांना यापूर्वी दिला गेलेल्या हप्त्याची रक्कम परत करावी लागणार आहे. यासाठी नोटीसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने गेल्या दीड वर्षापासून पंतप्रधान सन्मान योजना लागू केली आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले व आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नंतर मात्र सरसकट सर्व शेतकऱ्यांना परंतु आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर वाढले. अनेकांनी नोकरीला असतांना, आयकर भरत असतांनाही या योजनेचा लाभ घेतला. आता मात्र अशा शेतकऱ्यांना निकषाच्या आधारे अपात्र ठरविण्यात येत आहे. त्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. निधी मिळालेले शेतकरीआतापर्यंत एकुण पाच हप्ते किसान सन्मान निधीचे वितरीत झाले आहेत. त्यातील अनेक हप्ते अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिला हप्ता एक लाख १८ हजार ३३४ शेतकऱ्यांना, दुसरा हप्ता एक लाख १५ हजार ३७८ शेतकऱ्यांना, तिसरा हप्ता एक लाख सहा हजार ५३३ , चौथा हप्ता ९३ हजार २९ तर पाचवा हप्ता ८७ हजार ३६४ शेतकऱ्यांना मिळाला आहे. सहाव्या हप्त्याची आता प्रतीक्षा आता आहे. अपात्र शेतकऱ्यांकडून वसुलीजिल्ह्यात अपात्र ठरलेल्या एक हजार ७४६ शेतकऱ्यांकडून आता वसुली केली जाणार असून त्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. तालुकानिहाय शेतकऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे: अक्कलकुवा तालुक्यातील ९४, धडगाव ३३, तळोदा २३२, शहादा ६५१, नंदुरबार ५४१ तर नवापूर तालुक्यातील १९५ जणांनी नियमबाह्य पद्धतीने योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७१ लाख ८६ हजार रूपयांची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. या बाबीची जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
करदाते असूनही लाभ घेणारे शेतकरी?अनेक शेतकरी हे नोकरीला आहेत. काहीजणांचा इतर व्यवसाय आहे. त्या माध्यमातून ते कर भरतात. त्यामुळे असे शेतकरी या योजनेत पात्र नसल्याचे पूर्वीपासून स्पष्ट असतांना त्यांनाही लाभ दिला गेला आहे. आता अशांवर गडातंर आले आहे.
किती कर भरतात?नोटीसा बजावलेले शेतकरी हे वर्षाला किमान दहा ते एक लाख रुपये कर भरत असल्याचे समोर आले आहे. अनेक सधन शेतकरीही पात्र ठरले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कुठल्या आधारे लाभ दिला गेला हा चौकशीचा विषय ठरू शकतो.
अपात्रतेची कारणे? शेतकरी अपात्र ठरण्याची इतरही कारणे आहेत. त्यात आधारकार्ड अपडेट नसणे, संयुक्त खाते असणे, खातेफोड नसणे. याशिवाय यादींची पडताळणी न करताच काही ठिकाणी लाभ दिला गेला आहे. त्यात काही शेतकऱ्यांची चुक नसतांना त्यांना भुर्दंड भरावा लागणार आहे.
अपात्र शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू आहे. वसुलीही लागलीच करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व तहसीलदारांना याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.-सुधीर खांदे,निवासी उपजिल्हाधिकारी