नंदुरबार : तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. सद्या प्रवासी संख्या मर्यादित असल्यामुळे फारशी गर्दी नसल्याचे दिसून आहे. परंतु अनेक प्रवासी स्वत: काळजी घेत असल्याचे चित्र आहे. सॅनिटायझर आणि मास्क यांचा वापर असल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवास करताना या दोन बाबींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन एसटी आगारातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एसटीचे चार आगार आहेत. या चारही आगारातून गेल्या १ एप्रिलपासून एसटी बसेस बंद होत्या. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी काही फेऱ्या या काळात सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवासी संख्या अपेक्षित मिळाल्यास बस फेरी सोडण्याची तयारी देखील चारही आगारांनी केलेली होती. परंतु एसटीने प्रवास करण्यास कुणीच धजावत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्हाअंतर्गत किंवा जिल्हाबाहेर लांब पल्ल्याच्या फेऱ्याच होऊ शकल्या नाहीत.
१ जूनपासून लॅाकडाऊन शिथिल झाल्यानंतर बसफेऱ्यादेखील सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्या अनुषंगाने ३ जूनपासून चारही आगारांनी काही फेऱ्या सुरू केल्या. परंतु प्रवासी संख्या मर्यादित राहिल्याने दुपारनंतरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचे चित्र होते. प्रवाशांना जसे माहिती होईल त्या प्रमाणे प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.