नंदुरबार : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत सर्वच अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष आपले उमेदवार रिगंणात उतरविणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून गेल्या निवडणुकीतील उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या ११ व पंचायत समितीच्या १४ जागांसाठी मंगळवारी निवडणूक जाहीर करण्यात आली. २९ जून रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होऊन त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी अगदी कमी दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे त्या सदस्यांची उमेदवारी तर राहणारच आहे. परंतु जे उमेदवार गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांनाही ते ते पक्ष उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस गेल्या वेळेप्रमाणेच राहील, अशी शक्यता आहे.
अर्थात काही ठिकाणी उमेदवारी बदलण्याची शक्यता आहे. ज्यांनी गेल्या वेळी चांगले मते मिळविली नाहीत; अशांना या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी न देण्याबाबतही पक्षांचा विचार राहणार आहे.
भाजपने आधीच शतप्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. शिवसेनादेखील आपले सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. काँग्रेसला शिवसेनेचा टेकू घ्यावा लागल्यामुळे काँग्रेसदेखील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रवादीचे उमेदवार काही ठिकाणी तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. आता पक्षाची स्थिती सुधारली असून पक्षही सक्षम उमेदवार देण्याकडे भर देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे.