वासुदेवाची स्वारी नंदुरबारहून शहादाकडे सरकली. भल्या सकाळी शहाद्यातील डोंगरगाव रोडवरील एका वसाहतीत वासुदेव आला. परिसरात नोकरीवर जाणा:यांची धावपळ, महिलांची मुलांना शाळेत सोडण्याची लगबग तर काही पेपर विक्रेते आणि इतरजण रस्त्यावर तेवढे दिसत होते. चालता चालता वासुदेव एका पॉश हॉटेल समोरील लॉनजवळ थांबला. तेथूनच दान मागण्यास सुरवात करू असे म्हणून वासुदेव तयारी करू लागला. एक, दोन ठिकाणी दान मागितल्यावर त्याला एका ठिकाणी चार ते पाच जण पेपर वाचत बसल्याचे दिसले. तेथे पोहचताच बसलेल्या सर्वानीच वासुदेवाला नमस्कार केला. आणि आपल्या गप्पा करू लागले. वासुदेव गप्पा ऐकण्यासाठी थोडा थांबला. गप्पांचा रोख अर्थातच पेपरमधील निवडणुकीचा बातम्या हाच होता. शहाद्यात यंदा कुणाला उमेदवारी जाहीर होते, कुणामध्ये लढत रंगते हा विषय चगळला जात होता. युती झालीच तर काय परिस्थिती राहील.. शहाद्यापुरते बोलायचे तर आघाडीतून स्थानिक राष्ट्रवादी बाहेर पडली आहेच. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही युती, काँग्रेस आणि अपक्ष असा सामना रंगला जातो काय? यावरच त्यांचे विचारमंथन सुरू होते. गेल्या वेळी एका पक्षाची उमेवारी जाहीर झालेली असतांना ऐनवेळी ती सोडून दुस:या पक्षात गेलेल्या उमेदवाराविषयीची चर्चा रंगली होती. काँग्रेसचा उमेदवाराचा निसटता पराभव आणि पाच वर्षात सत्ताधारींनी केलेले काम यावर मतेमतांतरे सुरू होती. यावेळी देखील तोच कित्ता गिरवला जाणार किंवा कसे.. परंतु पुलाखालून पाणी गेलेले आहेच, शिवाय अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पक्षांतर मोठय़ा प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे शहादा तालुक्यातील परिस्थिती कशी राहते. शहरापुरते बोलायचे तर पालिका निवडणुकीत झालेले मतांचे विभाजन विधानसभेत होईल का? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना कशी मते मिळाली. तेंव्हाची आणि आताची राजकीय परिस्थिती कशी बदलली यावर चर्चा रंगल्या होत्या. वासुदेव हे सर्व कान देवून ऐकत होता. चर्चा ऐकायच्या आणि पुढील भागात दान मागायला निघून जायाचे असे ठरवून वासुदेव निघणार तोच, बसलेल्यांपैकी एकाचा आवाज आला. अहो.. वासुदेवा चहा घेणार काय? दान घेण्यापेक्षा आमच्याकडून चहाच पिऊन जा हो.. असे म्हणून चहाचा आग्रह केला गेला. वासुदेवानेही त्यांना नकार न देता चहा घेण्यास सहमती दर्शविली. समोरच्या टपरीवाल्याला इशारानेच चहाची ऑर्डर दिली गेली. चहा घेतांनाही ईलेक्शन फिवरच्या गप्पा मात्र बंद झालेल्या नव्हत्या.. -वासुदेव
Vidhan Sabha 2019 आला वासुदेव.. पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहिले हो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:37 IST