तोरखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली असून, आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ईमेल व मेसेजने घेतली आहे. या वेळी दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहेत.
त्यामुळे लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे.
गतिमान युगात याची जागा आता संगणकाने घेतली आहे. आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव, आदर आपल्या लेखनातून होणारी देवाण-घेवाण मोबाइल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत.
आज काळ बदलला आहे. प्रगती होत असताना परस्पर संवादाची साधनेही बदलली आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचे जीवन बदलले. पूर्वी प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा. आता मात्र तो दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्रे गोळा करून पुढे पाठवत असे, आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले नाही तिथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावला आहे. पूर्वी दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते.
आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा, आजच्या संगणकीय युगात यात आमूलाग्र बदल झाले आहेत.
बसल्या जागी मोबाइलच्या मदतीने जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही संपूर्ण आधुनिक प्रगतीची किमया आहे.
नाही तर काही वर्षांपूर्वी ताई, माई, अक्का, पोस्टमन मामांची वाट पाहत असे. कधी कधी तर आमचं काही पत्रबित्र आलंय का, अशी विचारणादेखील करत असत. त्याकाळात नोकर भरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारे मिळत असत.
त्यात लग्नपत्रिकेपासून तर नोकर भरतीच्या ऑर्डरी, न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या नोटीसी, मनिऑर्डर, सर्वच प्रकारचे निरोप पोस्टमन मामांमार्फत मिळत असत. परंतु आता व्हाॅट्सॲप, ई-मेल व फेसबुकद्वारे काही क्षणातच सुख-दु:खाचा निरोप संबंधित नातेवाइकांपर्यंत पोचत असल्याने आता टपाल पेटी दिसेना अशी झाली आहे.