नंदुरबार : दोन दिवसानंतर सोमवारी व्यवहार सुरळीत होणार आहेत. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीदेखील कडकडीत बंद पाळण्यात आल्याने कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यात काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शनिवार व रविवारी दोन दिवशीय जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही दिवशी नागरिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा व धडगाव शहरांत हा बंद पाळण्यात आला होता. याशिवाय काही गावांनी देखील स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. यामुळे कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यास काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे. या दोन दिवशीय जनता कर्फ्यूत शहरी भागातील नागरिकांनी सहकार्य केेले. त्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट जाणवत होता. केवळ बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसून येत होते.
आज होणार व्यवहार सुरळीत
दोन दिवशीय जनता कर्फ्यूमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सोमवारी ते सुळीत होणार आहेत. असे असले तरी नागरिकांनी बाजारात एकाच वेळी गर्दी न करता संयम पाळला तरच या दोन दिवसाचा बंदचा उपयोग होणार आहे. गर्दी करून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता व मास्कचा वापर न करता बाजारात गर्दी केल्यास कोरोनाच्या संपर्क साखळी खंडित न होता ती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी संयम पाळावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, १ एप्रिलपासूनच्या लॅाकडाऊनची तयारी करण्यात येत आहे.