लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील २७ सामूहिक वनहक्कप्राप्त गावांच्या कृती आराखड्यासंदर्भात सर्व विभागाच्या प्रमुखांची गाव वनव्यवस्थापन समिती समिती सदस्यांची आढावा बैठक झाली. यात शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून १ आक्टोबरपर्यंत या गावांचे कृतीआराखडे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.याबाबत वनहक्क कायदा २००८ नुसार सामूहिक वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या गावांमध्ये गावांना मिळालेल्या सामूहिक वनक्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृती आराखडे बनविण्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे. त्याअंतर्गत निवडलेल्या २२ गावांमध्ये गावसमित्या तयार करून कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत आजची बैठक आयोजित केली होती. या वेळी प्रतिभा शिंदे, लोकसमन्वयचे संजय महाजन, जि.प. सदस्य गणेश पराडके यांच्यासह २७ गावांचे समिती सदस्य उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील वनविभाग, कृषी विभाग, महसूल विभाग मत्स्य उद्योग, पशुसंवर्धन व आदिवासी विकास विभाग यांचे अधिकारी, तळोद्याचे तहसीलदार पंकज लोखंडे आदी उपस्थित होते.बैठकीत प्रतिभा शिंदे यांनी देशात कोरोनामुळे सद्यस्थितीत जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट उभे राहिले आहे आणि आपल्या जिल्ह्यातही आदिवासी व शेतकरी शेतमजूर यांच्यावरही याचा परिणाम होऊन रोजगार आणि उपजिविकेची मोठी समस्या उभी राहणार आहे. त्यासाठी वनसंवर्धन व त्यातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजिविका व जीवनमान उंचावता येईल म्हणून या कृती आराखड्यात सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून गावाची विकास कामे करता येतील. तसेच स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धनही होईल, असे सांगत सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व विभागांनी या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे तसेच ही प्रक्रिया लोकांसाठी महत्वपूर्ण असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी आपापल्या विभागांची माहिती सादर करावी, अशा सूचना केल्या. बैठकीत विजय ब्राम्हणे, धनसिंग वसावे, दिलीप वसावे, मुकेश पावरा, नारायण पावरा, अशोक पाडवी, दिलवर पाडवी, निशांत मगरे यांच्यासह गाव समिती सदस्य सहभागी झाले होते.
कृती आराखडे १ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:49 IST