नंदुरबार : व्यापाऱ्यांकडून १ लाख १० हजार रुपये हिसकावून घेत अज्ञात चार जणांनी पळ काढल्याची घटना नंदुरबार येथील अवलगाजी दर्गा परिसरात गुरुवारी घडली होती़ याबाबत अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोेपी व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़बिरसत जि़ आनंद येथील व्यापारी नरेश पुरुषोत्तम वोढ हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत नंदुरबारमार्गे जात असताना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील अवलगाझी दर्ग्याजवळ थांबलेले असताना अज्ञात चार जणांनी त्यांना दमदाटी करुन धमकावून त्यांच्या जवळील रोख १ लाख १० हजार व मोबाईल चोरी केला होता़ वोढ यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली़ गुन्हाची माहिती मिळताच पोालीस अधिक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तत्काळ तपास सुरु केला़ मिळालेल्या माहितीनुसार संशयीत लपून बसलेल्या टेकडीजवळील जागी रात्री १ वाजेच्या सुमारास सापळा लावण्यात आला़ संशयित या ठिकाणी असल्याची खात्री होताच त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला़ छाप्यामध्ये ४ संशयित पैशांची हिस्सेवाटणी करीत असल्याचे दिसून आले़ कसून चौकशी केली असता राहुल रमण साळवे (३१) रा़ दत्त कॉलनी, नंदुरबार, रविंद्र प्रदिप पाडवी (३१) रा़ अंबिका कॉलनी, नंदुरबार, जंगलसिंग धरमसिंग ठाकरे (४५) रा़ अवलगाजी दर्गा नंदुरबार व सुनील कुमार सोनवणे (४८) रा़ वाटवी ह़मु़ नंदुरबार अशी त्यांनी आपली ओळख सांगितली़ आपणच १ लाख १० हजारांची लुट केल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून ९६ हजार ५०० रुपये हस्तगत करण्यात आले आहे़ पोलीस निरीक्षक किशोर नवले तसेच प्रदीप राजपूत, राकेश मोरे, आनंदा मराठे, अभय राजपूत यांच्या पथकाने काम पाहिले़
चोरीतील आरोपी काही तासात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:53 IST