सारंगखेडा ते न्यू असलोद हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वीच बनवला असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांच्या वेढ्यामुळे दररोज लहान-मोठे अपघातही होत आहेत. मध्य प्रदेशात जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र झुडपांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. ही समस्या संबंधित विभागाला लक्षात आणूनही दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरून शेतकऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. संबंधित ठेकेदाराला या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे पाच वर्षे करणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदार या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार वाहनधारक व शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, सारंगखेडा ते कहाटूळ रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपांमुळे अपघात होत आहेत. ही काटेरी झुडपे त्वरित तोडावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहादा तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष रणजितसिंग वेडूसिंग गिरासे यांनी दिला आहे.